सप्टेंबर महिन्यातली गणेशोत्सवाची सगळी लगबग संपली तसा हळूहळू उन्हाळाही ओसरत चाललं होता. उकाडा आणि गारवा ह्यांच्या विलक्षण लपंडावामुळे ऑक्टोबर महिना येऊनही शरद ऋतूने आपले रंगकाम अजून सुरु केले नव्हते. तरी क्वचित एखाद्या संध्याकाळी येणारी थंड वाऱ्याची झुळूक सरत्या उन्हाळ्याच्या जखमांवर खपली धरायला मदत करत होती.
ऑक्टोबर महिना जसजसा पुढे सरकत होता तसा आजूबाजूला एक बदल दिसायला लागला. सुपर मार्केट्स आणि मॉल्स बाहेर नवीन केशरी आणि काळ्या रंगाचे देखावे आकार घेऊ लागले होते. त्यात, आत शिरण्याच्या दरवाजात फुगवलेल्या केशरी कमानी आणि शेजारी, ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ म्हणत जशी म्हातारी निघाल्याचं लहानपणी ऐकलं होतं, अगदी तसाच भलामोठा भोपळा! फक्त हा भोपळा हसरा इतकाच काय तो फरक. ह्या भोपळ्यात सोडलेले दिवे बघून जपानी म्हाताऱ्या हायटेक असल्याचा साक्षात्कार झाल्यावाचून राहिला नाही. पुढे सरकत्या ऑक्टोबर महिन्या बरोबर हे देखावेही भव्य होत गेले.
जपान मध्ये ही लगबग वाढली असतानाच भारतात मात्र एक वेगळंच वातावरण असेल असं वाटत होतं. गणपतीचे पेंडॉल जाऊन तिथे नवरात्रीची आरास उभी राहत असेल, घरोघरी येऊ घातलेल्या सणासुदीची गडबड असेल, बाजारपेठा भरलेल्या असतील वगैरे समांतर विचार मनात येत होते. घटस्थापनेनंतर आरत्या म्हणणं, कुंड पेटवून घरभर सुंगंधीत धूर करणं, आणि संध्याकाळ झाली की परभणीतले वेगवेगळे, हलते देखावे बघणं हा लहानपणीच नित्याचा कार्यक्रम असायचा. पण इथे जपानमध्ये मात्र मला एका वेगळ्याच देखाव्याची अनुभूती येत होती.
आणखी काही दिवस गेले आणि ३१ ऑक्टोबर उजाडला. दरवर्षी येणारा ३१ ऑक्टोबर मला त्या अगदी पहिल्या वहिल्या ३१ ऑक्टोबरची आठवण करून देतो. तो नेमका सुट्टीचा दिवस होता त्यामुळे आम्ही सगळेच घरी होतो. थोडा फेरफटका मारून, घरातली कामं उरकरून आम्ही बातम्या बघत असताना दारावरची बेल वाजली. दरवरची बेल जर अपेक्षित अथवा माहितीतली असेल तर दार उघडण्याच्या शर्यतीत पुरुष मागे आणि स्त्रिया पुढे असतात पण ही अनपेक्षित घंटा होती म्हणून मी उठलो आणि दार उघडलं. समोरचा प्रकार बघून एक भलंमोठं प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर उमटलं. ती मुलगी अगदी आमच्या शेजारी राहणाऱ्या मुलीसारखीच होती फक्त एकाएकी तिचे सुळे नेहमीपेक्षा लांबले होते आणि डोक्यावर शिंग दिसत होते (किशोर वयातले नाही, ते कालांतराने फुटतीलच). तिच्या एका हातात चेटकिणीचा झाडू आणि दुसऱ्या हातात साधूंच्या कमंडलू सारखं एक प्लास्टिकचं काळं कमंडलू दिसत होतं. ती फक्त हसत होती आणि तिला माझ्या गोंधळलेल्या अवस्थेशी तिला स्वैरसुतक नव्हतं. माझ्या मागून मुलाला कडेवर घेऊन बायको जेव्हा आली तेव्हा दोघी अगदी मनसोक्तपणे माझ्याकडे बघून हसल्या. दार लावता लावता बायकोने तिच्या कमंडलूमध्ये २ चॉकलेट्स टाकली आणि त्यामुलीची तपश्चर्या पूर्ण झाली. एखादा आशीर्वाद द्यावा तसं, ‘हैप्पी हॅलोविन आंटी’ म्हणून ती नाहीशी झाली. अंकलला झालेलं हे विराटरूप दर्शन नवीनच होतं. कालांतराने बायको कडून हॅलोविन ह्या प्रकारची सविस्तर माहिती मिळाली आणि हायसं वाटलं. पुढं चिरंजीव जसजसे मोठे होत गेले तसं ह्या गोष्टी आणखी कळत गेल्या. प्लॅस्टिकची कमंडलू घेऊन दारोदार चॉकलेट मागणं, फॅन्सी ड्रेस स्पर्धे सारखं कधी चेटकीण, कधी भूत, ममी, पाश्चात्त्य सिनेमातली पात्रं इत्यादी पोषाख, चेहऱ्यावरचं विलक्षण रंगकाम म्हणजे अगदी गाल फाटून दात दिसतील असं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवतीभवती बघण्याची सवय झाली आणि कालांतराने हॅलोविनशी काहीशी वीण जुळली असं म्हणायला हरकत नाही.
असं असूनही आणि हे सगळं अंगवळणी पडूनही एक गोष्ट मात्र दरवर्षी जाणवत राहते. आम्ही लहान असताना नवरात्रात जसं रोज देवीच्या दर्शनाला जाणं, उपास-तापास करणं, गेला बाजार चप्पल सोडणं ह्या जशा सामान्य गोष्टी होत्या तशीच आसपासच्या घरांमध्ये जाऊन जोगवा मागायची एक पद्धत होती. नवरात्री दरम्यानचे मंगळवार, शुक्रवार विशेष असत. निदान ५ घरी जाऊन धान्य किंवा पीठ मागायचं असा प्रघात होता. घराच्या दारात जाऊन, ‘आंबा बाईचा जोगवा’ अशी हाक देताच आतून पायलीभर धान्य किंवा पीठ आणून दिलं जायचं. माझ्या आईच्या आग्रहास्तव एकदा फक्त लाजत लाजत एकाच घरी जोगवा मागितल्याचं मला आठवतं. हाच संकोच, अहंकार मोडून काढणं हीच ह्यामागची भावना. माझ्या मोजक्या मित्रमैत्रिणींचे आईवडील वगळता बहुतांश पालकांची जोगवा मोहीम अयशवी ठरली ह्यात शंका नाही.
ह्या सविस्तर आठवणी मागचं कारण इतकंच की, दरवर्षी हॅलोविनच्या दिवसात मला जोगव्याची आठवण होते. जितका संकोच जोगवा मागायला आमच्या मनात होता तितकाच किंबहुना जास्त उत्साह आज कालच्या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये चॉकलेट्स मागण्या बाबत दिसतो. ह्याची प्रचिती मला दरवर्षी नव्याने येत जाते. उलट हा उत्साह सरत्या वर्षागणिक द्विगुणीतच होत असल्याचं दिसतं. जी आरास जे देखावे पूर्वी दुकानांबाहेर असायचे ते आज घरोघर दिसायला लागलेत. जपान सारखा पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव असलेला देश हे सण अगदी उत्साहाने साजरे करतो. पण गेली काही वर्षं, ओटीटी आणि समाज माध्यमांमुळे भारतही आता मागे नाही असे चित्र दिसू लागले आहे. हॅलोविन दरम्यान समाज माध्यमांवर चाललेली फोटोंची चढाओढ हे त्याचंच द्योतक आहे. सरते शेवटी एका गोष्टीची मात्र खंत वाटते आणि एक फरक अगदी ठळकपणे जाणवतो. भारतीय संस्कृतीतल्या गोष्टी ह्या डाऊनमार्केट, ओल्डस्कुल आणि पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण हा ट्रेंड. ह्या ट्रेंड मध्ये वाहणाऱ्यांना ट्रीट आणि मागे पडलेल्याना ट्रिक हीच ह्या नव्या ट्रेक वर ट्रीट ची गंमत आहे असं वाटतं.
- देवेन पहिनकर


Leave a comment