तितकच बघ जितकं दाखवतायत
तितकच खा जितकं चाखवतायत
तुला खुप हौस असेलही
पण त्याचा कोणाला त्रास नको
कुठेही तुझा मुक्काम बेताचाच ठेव
स्वतः खर्चिक राहा पण त्यांचे हिशेब ठेव
तुला कसली हाव नसेलही
पण त्यांना बोलायला वाव नको
विचारतील तितकच बोलत जा
नेतील तिथे निमूटपणे जात जा
तुला खूप भटकायचं असेलही
पण त्यांच्या पायी घाव नको
रीती बदलल्यात तू जुळवून घे
तुझ्या सरळ रस्त्याना वळवून घे
तू लाख बदल स्वतःला
पण त्यांना बदलायला जाऊ नको
तू कोणाला लावून घेऊ नको
अन मनालाही लावून घेऊ नको
तुला खूप वाईट वाटेलही
पण त्यांच्या डोळ्यात ओल नको
– देवेन पहिनकर


Leave a reply to kavita Patil Cancel reply