कविता सुचतात खऱ्या

Published by

on

मला कविता सुचतात खऱ्या
पण कवितांना मी रुचत नाही
मी असाच शब्दांशी खेळ करतो
अंजारतो गोंजारतो अगदी ओरडतोही
पण सगळा कसा शब्द चिखल
दलदली सारखा खोल खोल गेलेला
मी शब्दागणिक इंच इंच खाली सरकत जातो
अडकत जातो खोलवर दडलेल्या माझ्याच शब्दांच्या अर्थांमध्ये
अगदी तिथेच गुरफटून गेल्या सारखा
एक केविलवाणा प्रयत्न म्हणून मी हातपाय मारतो
पण फक्त ओरखडे ओढले जातात त्या चिखलावर
शब्दांचे… शब्दांनी कधी कुरवाळणारे कधी बोचणारे
वाटतं ह्याला तरी कविता म्हणूया पण मनाशीच हसतो
कारण…
मला कविता सुचतात खऱ्या
पण कवितांना मी रुचत नाही

-देवेन पहिनकर

Leave a comment